जळगाव मिरर | १२ मे २०२३
शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विद्या नगर परिसरातील रहिवासी मनोज हरिश्चंद्र पाटील यांच्या मालकीची आव्हाणे शिवारात गट नं ६८८ या ठिकाणी शेती असून ते मंगळवार ९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात गेले असता त्यांना शेतातील बोअरिंगजवळ एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत हांडांचा सांगाडा आढळून आला. त्यांनी याची माहिती लागलीच तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला.
या प्रकरणी बुधवार १० मे रोजी शेतकरी मनोज पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सायकर हे करीत आहेत. दरम्यान, या व्यक्तीचा गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मयत व्यक्ती कोण, तो या शेतात नेमका का आणि कशासाठी आला. कुजलेला मृतदेह तसेच हाडांच्या सांगड्यावरुन ओळख पटविण्याचे मोठे आव्हान तालुका पोलिसांसमोर आहे