जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२४
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे.
वाल्मीक कराड याने मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचे सांगितले होते. तो आपल्या व्हिडिओत म्हणाला, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.
संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस शरणचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड आज सरेंडर करणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी ही माहिती आपल्याला वाल्मीक कराड यांच्या निकवर्तीयांनीच दिल्याचे सांगितले होते.