जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२६
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने शहर जलमय झाले असतानाच शुक्रवारी दुपारी तांबापुरा परिसरात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या आगीत तीन दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा परिसरातील जी.एन. टेलर्स, अण्णा पंचर यांसह शेजारील आणखी एका दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसाचे पाणी आणि उपलब्ध साधनांचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचा बंब आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा जोरदार फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
घटनेनंतर इच्छादेवी चौफुली ते डी-मार्ट या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली. बघ्यांची संख्या वाढल्याने आणि अग्निशमनची वाहने घटनास्थळी पोहोचल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आगीची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून नुकसानीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या आगीत दुकानांतील साहित्य आणि उपकरणांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अग्निशमन विभाग आणि संबंधित यंत्रणेकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




















