पाचोरा : प्रतिनिधी
पहिले तीन पती असताना चौथ्याशी घरोबा करून फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात सहा जणांच्या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नवरीसह चारजणांना अटक करण्यात आली आहे.
सागर उत्तम दांडगे (२८, रा. भवानीनगर वरखेडी नाका, पाचोरा) याचा विवाह ११ जानेवारी २०२२ रोजी सपना ऊर्फ नम्रता संजय पवार (२२, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) हिच्याशी काकणबर्डी, ता. पाचोरा येथे झाला. यासाठी सखुबाई भिकन शिंदे (४५, रा. मोंढाळा रोड, पाचोरा) हिच्यासह दलाल समाधान वसंत दहातोंडे (रा. देऊळगाव), विजय रामभाऊ मुळे (रा. भिऊगाव ता देऊळगावराजा), आशाबाई ऊर्फ सखुबाई भिकन शिंदे (रा. पाचोरा) व अन्य दोन महिला या मध्यस्थी होत्या.
यावेळी सागर याच्या वडिलांनी १ लाख ६० हजार रुपये रोख दागिने घेण्यासाठी दलालामार्फत दिले होते. मात्र नवऱ्या मुलीला कोणत्याही प्रकारचे दागिने न घेता ते पैसे वरील चारही जणांनी वाटून घेतले. लग्नानंतर सपना ही पाचोरा येथे सात दिवस राहिली. दलाल समाधान दहातोंडे याच्यासोबत माहेरी जाते म्हणून निघून गेली. ती परत न आल्याने सागर याने तिला परत येण्याविषयी सांगितले. नंतर तिने त्याला देऊळगावमही येथे बोलावून घेतले आणि महिनाभर तिथे थांबण्यास सांगितले. सागर यास तेथे मारहाण करण्यात आली. स्वतःचा जीव वाचवत सागर याने पाचोरा गाठले आणि पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी नवरीसह दलालांना अटक केली. सपना हिचा यापूर्वीच तीन जणांशी असा विवाह झालेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.