जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२४
नार पार योजना ही आमची हक्काची असून आमचे पाणी गुजरातला वळवण्याकरता नार पार गिरणा खोरे योजना केंद्र सरकारने रद्द केल्याचे पाप केले आहे. गुजराथ धार्जिणे राज्य सरकार तोंडावर बोट हाताची घडी घालून बोटचेपी भूमिका घेत आहेत ही भूमिका गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांमध्ये असंतोषचा तीव्र उद्रेक झाला आहे. आज गिरणा नदी पात्रात अकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलनात बसलो आहे. मुसळधार पावसात कृती समिती शेतकऱ्यांसह आंदोलन सुरू असून नार पार योजना मंजूर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर मात्र जलसमाधी आंदोलन थांबवणार नाही. अशी तीव्र भावना माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज मेहुणबारे ता. चाळीसगांव येथील गिरणा नदीच्या पुलाजवळील पंपिंग स्टेशन जवळ त्यांनी गिरणेच्या प्रवाहात उतरून प्रचंड घोषणाबाजी करीत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. आजच्या आंदोलनामध्ये नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रचंड घोषणाबाजीने हायवेवरून जाणारे वाहन चालक, मोटरसायकल चालक, ग्रामस्थ यांचे आंदोलनाने लक्ष वेधले जात असून मुसळधार पावसात तिरंगा हातात घेऊन शेतकरी सामील झाल्याने आंदोलनाची आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे.
या आंदोलनाला माजी खासदार उन्मेशदादा पाटील,बंजारा समाजाचे नेते मोरसिंगभाऊ राठोड, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर महेंद्रसिंग पाटील, रमेश चव्हाण, दिलीप घोरपडे, अनिलबापू निकम, ऍड राजेंद्र सोनवणे, विवेक सोनवणे, कैची बापू पाटील,भीमरावनाना खलाणे,बाळासाहेब पाटील,चांगदेव राठोड,नरेंद्र जैन, प्रताप पाटील, किशोर पाटील, कैची बापू पाटील,रवींद्र मोरे,सारंग जाधव, संजय पाटील, नरेश साळुंखे,चेतन वाघ, भैय्यासाहेब वाघ, दीपक खंडाळे, पद्माकर पाटील, प्रवीण पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकेश गोसावी, सागर रणदिवे, राज महाजन, भास्कर पाटील, कल्पेश मालपुरे, वाल्मीक महाले, सोनू अहिरे, रॉकी धामणे, किरण घोरपडे, राहुल पाटील, राहुल रणदिवे, माधव रणदिवे, रोहित भारती, अमित सुराणा, शुभम पाटील, निलेश देसले, लक्ष्मण उन्हाळे, सौरव पाटील, प्रमोद निकम, हेमराज वाघ, प्रताप पाटील, हिरामण वाघ, सचिन पाटील, शेषराव चव्हाण यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलनकर्ते करते सहभागी झाले आहेत.
अकरा वाजेपासून माजी खासदार गिरणा नदी पात्रात रात्रभर आंदोलन राहणार सुरु
खासदार उन्मेश दादा पाटील हे नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या सदस्यांसह गिरणा नदीत जलसमाधी साठी ठाण मांडून बसले असून त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जोपर्यंत ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही नदीच्या पात्रातून बाहेर येणार नाही. हल्ला नसूनही आंदोलन सुरू राहणार आहे. गिरणा खोरे समृद्ध करण्यासाठी नारपार योजना महत्त्वाची असताना वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन देऊन पाठपुरावा करून केंद्र सरकारमध्ये लोकसभेत प्रश्न उचलून धरला,आमदार असताना विधानसभेत प्रश्न उचलून धरला तरी देखील शासनाने याविषयी गंभीर न राहता गुजराथ राज्याला फायदा होईल म्हणून नारपार योजना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी रद्द केली याचे आम्हाला दुःख आहे. आमच्या हक्काचे पाणी गिरणा धरणात सोडल्यास चाळीसगाव पाचोरा भडगाव एरंडोल पर्यंतचा सिंचनाचा अनुशेष भरून निघत गिरणा खोरे समृद्ध होणार असून आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनाला 11 तास उलटून देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा
नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदन, पाठपुरावा, आंदोलन करुन देखील आजच्या जलसमाधी आंदोलनाबाबत प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप उसळला असून जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात राहणार असून हे आंदोलन रात्री देखील सुरु राहणार असल्याने गिरणा खोऱ्यात प्रचंड असंतोष पसरला आहे.