जळगाव : प्रतीनिधी
ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या मुलीकडे गेलेल्या छगनलाल शांतीलाल सव्वालाखे (जैन) यांच्या बंद घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने, देवी-देवतांच्या मूर्ती असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी १२ ते १३ जुलै दरम्यान पिंप्राळा परिसरातील विद्यानगरात झाली. या प्रकरणी १८ जुलै रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पिंप्राळा परिसरातील विद्यानगरातील छगनलाल सव्वालाखे हे पत्नी सुरेखा सव्वालाखे यांच्यासह राहतात. त्यांची मोठी मुलगी श्वेता ऑस्ट्रेलियात तर दुसरी मुलगी सपना भोपाळ (मध्यप्रदेश) येथे राहते सव्वालाखे दाम्पत्य १ मे रोजी ऑस्ट्रेलियात असलेल्या मुलीकडे गेले आहे. घरी कोणी नसल्याने त्यांच्या शेजारी राहणारी महिला दररोज झाडांना पाणी टाकण्यासाठी येते. १३ जुलै रोजी ही महिला पाणी टाकण्यासाठी आली त्यावेळी सव्वालाखे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यावेळी महिलेने सव्वालाखे यांना फोन करून याविषयी माहिती दिली. त्यांनी लहान मुलगी सपना जैन यांना कळविले. त्यांनी जळगावात येऊन घरात पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच घरातील रोख १३ हजार ५०० रुपये, पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅमची सोन्याची नथ, एक ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन ग्रॅमचे सोन्याचे महालक्ष्मीचे नाणे, ३० ग्रॅमचे चांदीचे नाणे, २० ग्रॅमचे चांदीचे जोडवे, ५० ग्रॅमचे नागदेवता, अनंत, सूर्यदेवता असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या विषयी सपना जैन यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस ३०५, ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.