जळगाव मिरर | २२ जून २०२५
मुक्ताईनगर येथे वनविभागाच्या पथकाने केलेल्या गस्ती दरम्यान अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. ही कारवाई मलकापूर ते मुक्ताईनगर मार्गावर, बोदवड चौफुलीच्या जवळ दि. २१ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.
पथकामध्ये मुक्ताईनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. शिंदे, वनपाल रुईखेडा श्रीमती डी. ए. जाधव, वनरक्षक हरताळा श्रीमती डी. ए. बेलदार, वनरक्षक माळेगाव श्रीमती आर. जी. शिर्के, वाहन चालक सुरेश महाले आणि वनमजूर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ट्रक (क्रमांक एमएच २८ बी ७३२३) थांबवून तपासणी केली. तपासणी दरम्यान सदर ट्रकमध्ये अंदाजे १४ घनमीटर मिश्र प्रजातीचे जळाऊ लाकूड विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. लाकडाची किंमत अंदाजे ९ ते १० हजार रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक आणि सहायक वनसंरक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




















