जळगाव मिरर | ३० जुलै २०२६
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि. न. चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी कॉलनी, जळगाव येथे इंडियन डेंटल असोसिएशन आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ३० जुलै) मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरात डॉ. योगेश सुभाष पाटील आणि डॉ. दीक्षा दिलीप सिखवाल (श्री दंत डेंटल क्लिनिक) यांनी सुमारे २५० विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, तोंडाचे आरोग्य, योग्य आहार, नियमित ब्रश करण्याचे महत्त्व तसेच दंत आजारांपासून बचावासाठी आवश्यक सवयींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी, विद्यमान अध्यक्ष प्रमोदभाऊ चांदसरकर, सौ. सुप्रिया चांदसरकर आणि श्रीमती सीमा चांदसरकर यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत निरोगी जीवनासाठी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री पाटील, स्वप्नील भोकरे, महेश तायडे, पूनम पाटील, रोहिणी निकम, मनीषा वाघ, साधना पाटील, धनश्री हरणे, उज्वला भामरे, सुनीता पाटील, मिनल माळी, भूषण अमृतकर आणि प्रिया कोपरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या दंत आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. तपासणीसोबतच योग्य दंत आरोग्याच्या सवयींबाबत दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




















