जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
पोलीस काका त्या बंदूका दाखवा ना… वॉकी-टॉकीवाल्या फोनचा काय उपयोग… अशा शेकडो प्रश्नांना उत्तरे देत पोलीस काकांनी चिमुकल्यांना पोलीस स्टेशनची अनोखी सफर घडविली. पोलिसांविषयी मनामध्ये असलेली भिती आणि त्यांच्या कामाविषयीची उत्सुकता असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कमी केली. येथे मुलांनी बंदूक जवळून पाहण्यासोबतच पोलिसांसह महिला अधिका-यांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या.
प्राथमिक विभागातील विध्यार्थ्यांसाठी कारगिल दिनानिमित्त मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, राजेंद्र उगले, प्रदीप पाटील, इश्वर लोखंडे, गणेश वंजारी, हेमंत जाधव, अभिजित सैंदाणे, विनोद अस्कर, साईनाथ मुंडे, राजश्री बाविस्कर हे पोलिस उपस्थित होते.
यावेळी पोलिसांतर्फे चिमुकल्यांना खाऊ देण्यात आला. तसेच या भेटीचे प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, शहरात ठिकठिकाणी उभे असलेले पोलीस तसेच चित्रपटांमध्ये सातत्याने दृष्टीस पडणारे पोलीस पाहून बाल सुलभ मनामध्ये पोलिसांबद्दल कुतूहल निर्माण होते याच कुतूहलापोटी विध्यार्थ्यानी पोलीस स्थानक पाहण्याची इच्छा शिक्षकांकडे व्यक्त केली व विद्यार्थ्यांना समाजातील सर्व घटकांचे महत्त्व समजावे यासाठी देखील हि भेट एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने घडविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले यानंतर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना पो. नि. दत्तात्रय निकम म्हणाले कि,”लहान मुलांच्या मनात पोलीस स्टेशन आणि पोलिसांविषयी अनेक प्रश्न व उत्सुकता असते. त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम समाजातील वेगवेगळे घटक पोलिसांशी जोडण्यास उपयुक्त ठरतील तसेच अठरा वर्षे पूर्ण होण्याअगोदर व परवाना नसताना वाहन चालवू नये असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र उगले व पोलिस हेड कोंस्टेबल प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रे, बंदुक आदींबाबत माहिती दिली. तसेच पोलिस स्टेशनचा दैनंदिन कारभार, गुन्हा नोंदविणे, गुन्हेगारांची कोठडी याविषयी माहितीही विद्यार्थ्यांना या भेटीदरम्यान देण्यात आली. या भेटीचे संयोजन स्कूलच्या शिक्षिका निकिता जैन, वैशाली काळे, नेही शिंपी यांनी केले होते.