जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।
आज सर्वत्र अक्षय तृतीय सण साजरा केला जात आहे. या दिवशी सोने खरेदीसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जात असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली असतांना सणाच्या पूर्व संध्येला याच भावात घसरण दिसून आल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे. सोने ४०० रुपयांनी तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली. त्यामुळे दुपारनंतर सुवर्णनगरीतील सराफी बाजारात ग्राहकांची वर्दळ चांगलीच वाढली होती.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावच्या सोने-चांदीच्या बाजारात १५ ते २० तर राज्यात ३ हजार कोटींपर्यंत उलाढाल होईल, असा विश्वास सराफी व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे, अनेकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच सोने खरेदीसाठी सराफी बाजार गाठला. पारंपारिकसह कलाकुसरीच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येत आहे. त्याचबराेबर साेन्याचे वळे आणि नाणी यांचीही खरेदी हाेण्याची शक्यता आहे.
सोने : गुरुवारी सोन्याचे प्रति तोळा ६१ हजार रुपये दर होते. शुक्रवारी मात्र ४०० रुपयांनी दर घसरले आणि सोने ६० हजार ६०० रुपयांवर आले. तर चांदी : शुक्रवारी ६०० रुपयांनी घसरण झाली. गुरुवारी ७५,८०० रुपये प्रतिकिलोचा दर असणारी चांदी शुक्रवारी ७५,२०० रुपयांवर आली होती.