
जळगाव मिरर | २० मार्च २०२५
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगभरात भारताची मान अभिमानानं उंचावणारा गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा राम सुतार यांनीच घडवला होता. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी बईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला. राम सुतार यांनी आत्तापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे.
राम सुतार यांनी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या प्रसिद्ध पुतळ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ द्वारे स्वतःला महान शिल्पकारांच्या श्रेणीत समाविष्ट केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, जो 182 मीटर (597 फूट) उंच आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी केले. हे स्मारक सरदार सरोवर धरणापासून 3.2 किमी अंतरावर बांधले आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ तयार करण्यासाठी त्यांना त्यांचा मुलगा अनिल सुतार आणि इतर डझनभर सहकाऱ्यांकडून दिवसरात्र सहकार्य मिळाले. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली.