जळगाव मिरर | ३० जुलै २०२६
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि. न. चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी कॉलनी, जळगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुंच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे हे होते. त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुंची भूमिका याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या महत्त्वावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी, विद्यमान अध्यक्ष प्रमोदभाऊ चांदसरकर, सौ. सुप्रिया चांदसरकर आणि श्रीमती सीमा चांदसरकर यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्नील भोकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांच्यासह जयश्री पाटील, स्वप्नील भोकरे, महेश तायडे, पूनम पाटील, रोहिणी निकम, मनीषा वाघ, साधना पाटील, धनश्री हरणे, उज्वला भामरे, सुनीता पाटील, मिनल माळी, भूषण अमृतकर आणि प्रिया कोपरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे शाळेत भक्तिमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




















