जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४
राज्यातील बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरमधील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही. हे एन्काऊंटर नाही” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून बाहेर काढल्यापासून ते छत्रपती शिवाजी रुग्णालयात मृत घोषित करेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले. या प्रकरणी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
बदलापूर येथील शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी ठाण्याजवळील मुंब्रा बायपासवर पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला होता. अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेत पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला.
वकील हितेन वेणेगावकर यांनी बुधवारी न्यायालसमोर महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. त्यांनी एन्काऊंटरचा घटनाक्रम सांगितला. त्यावर न्यायालयाने, “आरोपीने रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन पोलिसांच्या दिशेने गोळीबार करणे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे,” अशी टिप्पणी केली. आरोपींच्या मृत्यूची चौकशी निःपक्षपातीपणे व्हायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे.