जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२४
नातेवाईकांशी संपर्क करीत आपण आत्महत्या करीत असलयाचे सांगत जळगाव शहरातील शनिपेठ भागात राहणाऱ्या बबली अरुण ढंढोरे (वय ५०) या महिलेने तापीनदीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात बबली ढंढोरे या महिला वास्तव्यास होत्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता तापी पुलावर पोहोचल्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क करीत आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही क्षणात त्यांनी तापी पात्रात उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक राहुल भंडारी, पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढीत ट्रामा सेंटरला शवविच्छेदनासाठी हलवला. महिलेचे जावई आकाश राजेश टाक यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.