अमळनेर : विक्की उत्तम जाधव
‛ज्याच्या हाती दिलीया देश विकासाची नाडी ,त्यानं विकली रेल गाडी , केल्या बंद मराठी शाळा अन अंगणवाडी ,त्यानं विकली रेल गाडी’ वाल्मिक फाजगे (खेडेगाव) या मार्मिक कवितेने सत्तेशी विद्रोह करत प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या शेकोटी काव्य पहाट संमेलनात अनेक कवींनी दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. अध्यक्ष म्हणून पत्रकार संजय पाटील होते.
संजय पाटील म्हणाले की मराठी भाषेतील बाराखडी चौदा खडीची झाली. ऍ आणि ऑ या दोन स्वरांचा नव्याने समावेश करण्यात आला हे शिक्षकांव्यतिरिक्त सामान्यांना माहीत नाही. ऋ हृस्व आणि दीर्घ होते त्यापैकी एक का वगळण्यात आले , ‘ञ’ हे अक्षर वाचता येत नसेल तर ते उजळणी च्या पुस्तकात का ठेवले हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मूक आणि कर्णबधीरांना समजेल अशी मराठी ,अशी कविता तयार होत नाही तोपर्यंत मराठी भाषा समृद्ध होणार नाही आणि संवर्धन होणार नाही. श्रावणी बुवा (पुणे) हिने सादर केलेली ‛स्त्री वाद कोरता कोरता ..बोथट झालं पातं , उथळ समाजाशी झुंजता झुंजता खऱ्या समाजाशीच तुटलंय नातं’ या कवितेतून जीवनाचे वास्तव कथन केले. समीक्षा मौर्य यांनी ‛आता माघार नाही’,चेतना बोरसे यांनी मराठी भाषेचा शृंगार , सुनीता मोरे , विकास पाटील ,गौतम निकम ,रेखा मराठे ,सुनील बैसाणे , विद्या मोरे ,आर आर धुरंदर ,सागर धनराज , डॉ शिवाजी राव , पापलाल पवार , धर्मेंद्र चौधरी , जगदीश ओहोळ आदींनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले. अध्यक्ष संजय पाटील , रामेश्वर भदाणे ,बापूराव ठाकरे , रणजित शिंदे ,विलास पाटील यांच्या हस्ते कवींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.