जळगाव मिरर | २१ मे २०२३
मुक्ताईनगर शहरात वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून वैष्णवीचा मृत्यू झाला. यामुळे अनेकांची मने हेलावली, डोळे पाणावले, कोवळ्या वयातच एक्झिट घेतली. पण तिचे मरणोत्तर नेत्रदान करून अंधकार असलेल्या गरजूंच्या जीवनात प्रकाश देण्याचा आदर्श तिच्या आई- वडिलांनी समाजासमोर उभा केला आहे.
शुक्रवारी वाढदिवसाची तयारी सुरू असताना वैष्णवी चेतन सनान्से (९) हिला कुलरचा शॉक लागला. आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने सनान्से परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. वैष्णवीच्या वाढदिवसाच्या रुपाने आनंदोत्सवच जणू साजरा होणार होता, परंतु तेथे शोककळा पसरली. अशा कठीण समयी वडील चेतन सनान्से, काका लखन सनान्से यांनी वैष्णवीचे मरणोत्तर नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लागलीच जळगाव येथील मांगीलालजी बाफना नेत्रपेढीशी संपर्क साधून वैष्णवीचे नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. नेत्र पेढीचे पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि मृत्यूनंतर अवघ्या चार तासांच्या आत वैष्णवीचे नेत्रदान झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. योगेश राणे यांनी सांगितले की, अगदी वेळेवर निर्णय घेऊन वैष्णवीच्या पालकांनी तिचे नेत्रदान घडविले.
एकीकडे सनान्से परिवारावर आभाळ कोसळले असताना त्यांनी वेळेवर वैष्णवीचे मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ती जगात नसली तरी तिच्या डोळ्यांतून अंधकार पसरलेल्या गरजूंच्या जीवनात प्रकाश पडेल आणि त्याला जगण्याचा आनंद मिळणार आहे. मुळात सनान्से परिवार हा आध्यत्मिक आहे. सलून व्यवसायापाठोपाठ फेटेवाले म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वैष्णवीचे वडील चेतन महाराज अंत्यविधीसमयी भजनी मंडळातही काम करतात…