
जळगाव मिरर | १४ मे २०२६
अमळनेर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मंगळवारी (दि. १३) दुपारी अमळनेर बस स्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिराचे पूजारी श्रीहरी प्रभाकर दीक्षित (वय ७८) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांत अमळनेर तालुक्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही पाचवी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीहरी दीक्षित हे अमळनेर शहरात धार्मिक विधी कार्यक्रम आटोपून आपल्या गावी परतण्यासाठी दुपारच्या सुमारास बस स्थानकात आले होते. त्यावेळी परिसरात प्रचंड उष्णता असून तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. उन्हाचा तडाखा आणि वाढत्या उकाड्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बस स्थानक परिसरातच कोसळले.
घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस कर्मचारी संजय बोरसे, विनय पाटील आणि रवींद्र बोरसे यांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली. पोलिसांनी वेळ न दवडता श्रीहरी दीक्षित यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे अमळनेर शहरासह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर न पडणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






















