जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२३
जामनेर तालुक्यातील देवपिंप्री गावी सख्या चुलतभावाकडे घर भरणीच्या कार्यक्रमासाठी सूरत येथून आपल्या बुलेटवर वडील आणि मुलगा हे येत असतांना पारोळ्या तालुक्यातील कडजी शिवारातील उड्डाण पुलावर या बुलेटचा अपघात होऊन यात मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना २१ न रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सूरत येथून बुलेट कंपनीची दुचाकी (जीजे ०५, एनटी- ५२२६) वर चालक रोहण श्रावण भोई व त्यांच्या मागे बसलेले श्रावण भोई हे सख्या चुलतभावाकडे असलेल्या घरभरणीच्या कार्यक्रमासाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात होते. पारोळा तालुक्यातील कडजी शिवारातील उड्डाण पुलावर या बुलेटचा २१ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. हे दोन्ही पिता-पुत्र हे गंभीर जखमी अवस्थेत ग्रामस्थांना पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास व चेहेऱ्यावर तसेच हाता, पायांना गंभीर इजा होऊन ते रस्त्याच्या बाजुला पडलेले होते. रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर व सहकाऱ्यांनी त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी करुन बुलेट चालक रोहण श्रावण भोई (वय २२, रा. सुरत) यांना मयत घोषित केले. तर बुलेटवर मागे बसलेले श्रावण भोई हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलिसात विकास पाटील (रा. कडजी,) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पारोळा पोलिस करत आहेत.
जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे २२ रोजी मयताचे सख्खे चुलत भावाकडे घरभरणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सूरत येथून हे बाप-बेटे रात्री बुलेटने निघाले होते. परंतु, कडजी गावाजवळ सकाळी झालेल्या घटनेत वडील गंभीर जखमी झाले तर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने देवपिंप्री गावात हळहळ व्यक्त होत आहे.