जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
कुटुंबिय कामावर गेलेले असतांना घराला अचानक आग लागून संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना गुरुवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर हुडको परिसरात घडली. या आगीमुळे संपूर्ण कुटूंब उघडयावर आले आहे. दानशूर व्यक्तींनी या कुटूंबाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर हुडकोत उत्तम नथ्थू शिंदे हे पत्नी नंदा, मुलगा जयेश यांच्यासह राहतात. त्यांचे दुस-या मजल्यावर घर आहे. शिंदे कुटूंबीय मोलमजूरी करीत असून त्यांनी त्यावर घर बांधले होते. गुरूवार सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिंदे कुटूंबिय घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. काही मिनिटांनी त्यांच्या घरातून अचानक धूर निघू लागला. ही घटना शेजारच्यांचा लक्षात येताच, त्यांनी नंदा शिंदे यांना कॉल करत तुमच्या घरात आग लागल्याची माहिती दिली. यानंतर संपूर्ण शिंदे कुटूंबियांनी घराकडे धाव घेतली.
परिसरातील नागरिकांनी घराचे कुलूप तोडून पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचा एक बंद देखील घटनास्थळी पोहोचला होता, या बंबाद्वारे आग विझविण्यात आली. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ता विजय बांदल यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी देखील आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतू, या आगीत घरातील संपूर्ण संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या घरातील कपाट, पलंग, धान्यासह कुलर, पाण्याची मोटार, कपडे, भांडयांसह सर्व संसारपयोगी वस्तू जळाल्याने कुटूंबाला अश्रु अनावर झाले होते. या आगीत सुमारे एक ते दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. हातमजूरी करणाऱ्या कुटुंबिय उघड्यावर आले असून त्यामुळे नागकिरांनी त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
