जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून दुचाकीने चाळीसगावकडे परतणारे पती-पत्नी ट्रकच्या धडकेत ठार झाले. ही भीषण घटना एरंडोलपासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलनजीक शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. अविनाश विजयसिंग पाटील (५८) व मीनाबाई अविनाश पाटील (५२, रा. चाळीसगाव) असे ठार झालेल्या दाम्प्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील यशवंत विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असेलेले अविनाश पाटील हे दुचाकी (क्र. एम.एच.१९ इड़ ४७१७) ने पत्नी मीनाबाई पाटील यांच्यासह पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला आले होते. अंत्ययात्रा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य घराकडे परत जात असतांना न्यू इंग्लिश स्कूलपासून थोड्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने (क्र.एम.एच. १८ बीजी १०६६) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मीनाबाई यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर अविनाश पाटील हेदेखील जागीच ठार झाले. अपघात घडल्याचे पाहून शेतकरी व मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व एरंडोल पोलिस स्टेशनला त्याबाबत माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हेकॉ. राजेश पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील हे लागलीच अपघातस्थळी दाखल झाले. अविनाश पाटील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान ट्रक चालकाला एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.