जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
थकीत कर्जाच्या रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, रा. नागपूर) यांच्यासह वसुली अधिकारी सुनिल गोपीचंद पाटील (वय ५४, रा. सुकृती पिनॅकल अपार्टमेंट) या दोघांना नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पुन्हा बीएचआर प्रकरण चर्चेत आले असून याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मधून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले होते. त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत अमलेल्या कर्ज रक्कमेत्ती एक रक्कम किती रक्कम भरावी लागेल याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेले होते. यावेळी संस्थेत काम करणारे वसुली अधिकारी सुनिल पाटील याने तक्रारदाराची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या मुद्दल कर्जाच्या रकमेत पाच टक्के रक्कम भरण्यासाठी अवसायकांकडून परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही रक्कम कमी करण्यामानी अवसायायक चैतन्य नासरे यांच्याकडे विनंती केली, मात्र त्यांनी लाचेची रक्कम कमी होणार नसून ती रक्कम वसुली अधिकारी सुनिल पाटील याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले. तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचला आणि वसुली अधिकारी सुनिल पाटील याला लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे, अमोल वालझाडे, पोहेकॉ प्रभाकर गवळी, पोना गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली