जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात गेल्या काही महिन्यापासून छोट्या मोठ्या कारणाने आयुष्य संपविण्याच्या घटना नियमित घडत असतांना दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एका व्यावसायिकाने दुकानात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रमेश देवराम पाटील (वय ५१ मु. रा. गाढोदा ता. जळगाव ह. मु. शिवशक्ती नगर, निमखेडी जळगाव) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पाटील हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून कॉम्प्युटरचा व्यवसाय करतात. त्यांचे ॲरोटेक कॉम्प्युटर नावाचे गोलाणी मार्केटमधील ग्राऊंड प्लोअरला सी -२४६ क्रमांकाचे दुकान आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रमेश पाटील यांनी दुकान उघडून देवांच्या फोटोला अगरबत्ती लावून पूजा केली. यानंतर अर्धवट शटर बंद करून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
दरम्यान दुकानात काम करणाऱ्या त्यांच्या साडूच्या मुलाने शटर उघडून पाहताच त्याने आरडा ओरड केल्याने आवाज ऐकून शेजारच्या व्यापाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी दोरीला लटकलेल्या अवस्थेत रमेश पाटील दिसून आल्यानंतर दोर कापून त्यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. रमेश पाटील यांच्या आत्महत्यामागाचे कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे.