जळगाव मिरर | २४ मे २०२३
जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने तीन मुलीना जन्म दिला असून यातील ‘जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे.
मध्यप्रदेशातील विवाहिता डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे उपचार घेत होती. जळगावचे माहेर असलेल्या या विवाहितेला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिला गर्भधारणा राहिली. त्यानंतर तपासणी केली त्या वेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ सुरक्षित असल्याने गर्भपाताचा पर्यायही संपला. त्यामुळे या दाम्पत्याने बाळंतपणासाठी तयारी दाखविली. त्यानुसार डॉ. नवाल यांनी मंगळवारी सकाळी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. नवजात लेकींपैकी जुळलेल्या जुळ्यांना तातडीने बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरव महाजन यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. नवजात जुळ्या लेकींचा मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र शरीर, हात आणि पाय एकत्र आहेत. त्यामुळे दोघींना दोन हातांनी आणि पायांनी सोबत जगावे लागणार आहे. दोघींना एकच हृदय आहे.
(हे वृत्त एका प्रसिद्ध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहे)