जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर हॉकर्सच्या अतिक्रमणाचा त्रास वाढला असताना आता हॉकर्समध्ये ग्राहक पळवण्यावरून हाणामारी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजता टॉवर चौकाजवळील जैन मंदिराजवळ घडली.शहर पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रमेश माळी (वय ४९, रा. शनिपेठ) या हातगाडीवर रेडिमेड कपडे विक्री करणाऱ्या हॉकर्सने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी सतीश चंद्रप्रकाश भैरवानी, त्याचा भाचा गणेश उर्फ गोलू भावसार, वडील चंद्रप्रकाश भैरवानी व बहीण रिचा नीलेश लोहार (सर्व रा. न्यू बीजे मार्केट) यांनी माळी यांच्या गाडीवर आलेल्या ग्राहकांना आवाज देऊन स्वतःकडे बोलावले. यावरून वाद झाला आणि त्यातून शिवीगाळ चापटा-बुक्क्यांनी मारहाण व चंद्रप्रकाश याने कापड बांधलेली लाकडी काठी उजव्या हातावर मारून दुखापत केली. गोलू भावसार याने माळी यांची बहीण कल्पनाच्या उजव्या हातावर लोखंडी वस्तूने दुखापत केली, अशी तक्रार दिली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.