जळगाव मिरर | २७ जून २०२३
जळगाव येथे एसटीने निघालेल्या महिला व तिच्या कुटुंबीयांच्या सुटकेसमधील सोन्याचे दागिने व रोकड असा ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी जळगाव येथे आकाशवाणी चौकापासून तर रेल्वे स्टेशन परिसरात लांबविल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील अशोक नगरमधील महिला ही पती, मुले व सासूसोबत नंदुरबार येथील लग्नाला जाण्यासाठी शनिवारी एसटी स्टॅन्डवर आली. जळगावला जाणाऱ्या एसटीत बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या सीटखाली चार बॅगा ठेवल्या. नेरी येथून चढलेल्या चार महिलांपैकी एक लहान बाळासह बॅगेजवळ बसली होती. आकाशवाणी चौकात त्या महिला उतरल्या. बसस्थानकावर फिर्यादी महिला ही कुटुंबीयांसोबत उतरून रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे गेल्या. स्टेशनवर बॅग उघडून पहिली असता दागिने व रक्कम लांबविल्याचे लक्षात आले. यात १८ हजारांचे कानातील दागिने, १५ हजाराची चेन, १२ हजाराचे रिंग, ३ हजाराची बाळी व २५ हजार रोख असा ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्या. महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिस तपास करीत आहेत.