जळगाव मिरर | २२ जुलै २०२६
नाशिक येथे बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोरणार गावाजवळ उघडकीस आली. ललित भिकन सोनवणे (वय ३३, रा. तुकारामवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या फुटलेल्या मोबाईलमधील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून त्याची ओळख पटविल्याने या तपासाची सर्वत्र चर्चा होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित सोनवणे हा जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात वास्तव्यास होता. तो पेंटरचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. १९ जुलै रोजी रात्री तो नाशिक येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेने निघाला होता. मात्र, प्रवासादरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोरणार गावाजवळील रेल्वे खांबा क्रमांक ३९६/२० ते ३९६/२२ दरम्यान अज्ञात कारणाने तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी, २० जुलै रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गाची पाहणी करणारे गँगमन गणेश भंगाळे हे त्या मार्गाने जात असताना रेल्वे रुळालगत एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील आणि कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही. मात्र, घटनास्थळी फुटलेला मोबाईल मिळून आला.
तपासात महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांनी फुटलेल्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून ते दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकले. त्यामधील संपर्क क्रमांकांवर फोन करून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी मयताचे मावसभाऊ उमेश वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख ललित भिकन सोनवणे अशी पटवून दिली. ओळख पटवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासानुसार धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, नेमका अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















