
जळगाव मिरर | ४ मे २०२६
जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गंभीर स्वरूपाची वीज समस्या निर्माण झाली असून, कमी दाबाने वीजपुरवठा होणे व वारंवार वीज खंडित होणे यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने महावितरण विभागाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की , दिवसभर अत्यल्प दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे व्यवस्थित कार्य करत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फ्रिज, पंखे, पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांवर परिणाम होत असून, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. राहुल सुरेश नेतेलेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात कंजरवाडा परिसरातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, कमी दाबाची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडितीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, लवकरात लवकर समस्येचे निराकरण न झाल्यास नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून, प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.




















