जळगाव मिरर | २ सप्टेबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीका करण्यासाठी कुठलेही कारण सोडत नसल्याचे सातत्याने दिसून येत असते नुकतेच सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज दि.२ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
खा.राणे म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काडी आणि पेट्रोल घेऊन तयार असतात. पवार सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही?, असा सवाल करून पवार काहीही कामाचा माणूस नाही, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर ठाकरे गटाकडून विनाकारण घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याने आदित्य ठाकरेला राजकोट किल्ल्यावरून जाऊ दिले, असे राणे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. ठाकरेंकडे बघून असे वाटतं की हे मुख्यमंत्री का झाले?, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले. पंतप्रधान मोदी यांच्यावर बोलण्याची त्याची लायकी नाही. त्यांना प्रशासनाचे ज्ञान नाही, कायद्याची माहिती नाही. आम्हाला शिवदोह्री म्हणणारे ठाकरे कोण ? असा सवाल राणे यांनी केला. पुतळा दुर्घटनेवर ‘मविआ’कडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरून निवडणुकीसाठी राजकारण केले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आगलावे आहेत. पेट्रोल घेऊन फिरतात, अशा शब्दांत राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.