
जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
राज्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटना घडत असतांना काल मध्यरात्री देखील अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफ अली खानच्या घरी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीची ओळख निष्पन्न झाल्याचा दावा मुंबईतील झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी आज (दि.१६) पत्रकारांशी बोलताना केला.
दीक्षित गेडाम म्हणाले की, काल रात्री, आरोपींनी सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यासाठी फायर एस्केप जिना वापरला. हा दरोड्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोराला अटक करण्यासाठी १० तपास पथके काम करत आहेत. वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, हल्लेखोर शिड्याचा वापर करून घरी घुसला. हल्लेखोर सतत ठिकाण बदलत असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. हल्लेखोर चोरीचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने घरात घुसल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्लेखोराला अटक केल्यानंतर पुढची माहिती मिळेल. हल्लेखोर सीसीटीव्हीत आढळून आला आहे, असे त्यांनी सांगितले.