जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्राच्या रंगभूमीला अनेक गाजलेल्या कलावंतांना घडविणारी मराठी बालरंगभूमी ही समृध्द रंगभूमी आहे. अनेक कलावंतांनी अभिनयाचं बाळकडू याच रंगभूमीवर घेतलं आहे. या मराठी बालरंगभूमीकरिता एक विशेष दिवस असावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बालरंगभूमी परिषद कार्यरत होती. मराठी बालरंगभूमीच्या इतिहासाचा अभ्यास करता, अखेर २ ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी जाहीर केले आहे.
२ ऑगस्ट १९५९ रोजी साहित्य संघाच्या सहकार्याने त्यांच्या नाट्यगृहात स्व. रत्नाकर मतकरी लिखीत व स्व.सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग रंगभूमीवर सादर करण्यात आला होता. हे बालनाट्य प्रचंड गाजले. सुधातार्इंनी रंगवलेली चेटकिणीची भूमिका ‘माईलस्टोन’ ठरला. या बालनाट्याने बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली तसेच लिटिल थिएटर या पहिल्या बालनाट्य संस्थेची सुरुवात या बालनाट्याने झाली. पुढे लिटिल थिएटरच्या बालनाट्य चळवळीने बालरंगभूमीचा पाया मजबूत केला. याच कारणामुळे २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय बालरंगभूमी परिषदेने घेतला आहे.
‘मराठी बालनाट्य दिन’ निमित्ताने बालरंगभूमीवर कार्यरत असणारे लेखक, दिग्दर्शक, बालकलाकार, तंत्रज्ञ, रसिक यांच्यासह शाळांसह बालकांशी संबंधित असणाऱ्या संस्थांनी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी केल्याचेही जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी सांगितले