जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२४
तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नयन भालेराव याने व्हिडिओ कॉल करून तिचा अश्लील व्हिडिओ तयार करीत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. ती पूर्ण न केल्याने हा व्हिडिओ व्हायरल केला. ही घटना डिसेंबर २०२२ ते दि. १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली. या प्रकरणी नयनसह त्याचा अल्पवयीन मित्र या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची नयन भालेराव याच्यासोबत ओळख निर्माण होऊन नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यादरम्यान तरुणाने केलेल्या व्हिडिओ कॉलवेळी तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यावरून तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. तरुणाने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळीत साधण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने विरोध केला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ अल्पवयीन मुलाला पाठवला. दोघांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत या तरुणीची बदनामी केली.
या प्रकरणी तरुणीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नयन भालेराव आणि अलपवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नयनला न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत