जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना येथे पत्रकार परिषद घेवून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारने ओबीसींच्या यादीत नव्या 15 जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. यावरुन जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका करत अनेक प्रश्न विचारले आहेत. आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत. येवल्याचा डुप्लिकेट नेता कुठे गेला? आता या जातींना विरोध का नाही? असा सवाल करत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या जातींचा ओबीसीत समावेश करत आहात, त्याबाबत महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का? असा सवाल जरांगेंनी विचारला. तसेच गिरीष महाजन भाजपचे पांचट मोचक असल्याची टीका जरांगे यांनी आज जालन्यातील पत्रकार परिषदेत केली.
मनोज जरांगे म्हणाले, मराठे आता शहाणे होतील. मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचे होते. सरकारने या जातींना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले आहे का? हे एकमेकांना लिफ्ट देत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीवाद कशासाठी? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. त्याला काय कळत हेंद्रा आहे तो…. त्याने मराठ्यांचा खेळ संपवला. त्याने काय नेरेटिव्ह सेट केला? आमच्या लोकांना पंधराशे रुपये देतो आणि इतर जातींना आयुष्यभराचे आरक्षण देणार, हे योग्य नाही. फडणवीस यांनी मराठ्यांवर काही उपकार केले आहेत का? उघड्या डोळ्यांनी तुम्ही मराठ्यांचा घात केला. जातवान मराठे तुमचा भुगा करणार, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. आमच्या समस्या अशाच राहिल्यानंतर, आम्ही सण कसे साजरे करणार? असा प्रश्न जरांगे यांनी विचारला आहे. मनोज जरांगे यांनी गिरीष महाजन यांच्यावरही निशाणा साधला. गिरीष महाजन भाजपचे पांचट मोचक आहेत. यांनीच या जाती ओबीसीत घेतल्या आहेत. ओबीसीत घेतलेल्या जाती गिरीष महाजन यांच्या जातीच्या उपजाती आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.