जळगाव मिरर | 6 ऑगस्ट 2026
अमली पदार्थाच्या उच्चाटनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून ‘युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते’ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘मिशन राईज’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांच्याहस्ते करण्यात आला.

‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र’ मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव पोलिस दलाने समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेणारा ‘मिशन राईज’ हा अभिनव जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून ‘युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते’ तयार करण्यात येत असून ते आपल्या महाविद्यालयात व परिसरात अमली पदार्थाविरुद्ध जनजागृतीचे नेतृत्व करतील. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, चाळीसगाव विभागाचे अशोक नखाते यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या विद्यार्थी नेत्यांमार्फत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन व मदतीसाठी प्रेरित केले जाणार आहे. ‘मिशन राईज’ हा उपक्रम त्याचाच एक भाग असून, भविष्यात प्रत्येक महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे युवा नेतृत्व निर्माण करण्याचा जळगाव पोलिसांचा संकल्प आहे. याची सुरुवात ७ ऑगस्टपासून मू.जे. महाविद्यालयातून होणार आहे. सर्व यंग लीडरला लावण्यासाठी बॅच देण्यात येणार आहे.
जळगाव पोलिस दलाने या अभियानासाठी विविध महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची निवड, त्यांचे मार्गदर्शन, जनजागृती कार्यशाळा, संवाद सत्रे, शपथविधी, रॅली, पोस्टर स्पर्धा आणि सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती अशा विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे.





















