जळगाव मिरर | २६ जून २०२३
गेल्या २० दिवसापासून पावसाळा सुरु झाला होता पण पाऊस दाखल झाला नव्हता मात्र दोन दिवसापूर्वीच देशासह राज्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. पावसामुळे काही डोंगराळ भागातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये काही भागात भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. तर शिमल्यात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट तर हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसानंतर मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्येही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत देशातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे देशात काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन झाल आहे. तर पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून या भागात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राजधानी दिल्ली येथे अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, गुरुग्राम, कुरुक्षेत्र आणि मोहालीच्या अनेक भागात पाऊस झाला. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही पाऊस पडला.