जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
राज्यातील प्रत्येक शहरात व खेडोपाडी भिकारी असतात पण सध्या मुंबई शहरातील एका भिखारीची जोरदार चर्चा सुरु आहे. शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर, मंदिराबाहेर भीक मागत असलेले अनेक जण दिसतात. काही जण रेल्वे स्टेशनमध्येही भीक मागताना दिसतात. भिकारी म्हटलं की विस्कटलेले केस, मळलेले फाटके कपडे असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं; पण आपल्या देशात एक करोडपती भिकारी आहे. तो मुंबईत भीक मागतो. त्याला पाहून तो करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे असं वाटणार नाही.
या भिकाऱ्याचं नाव भरत जैन असं आहे. भरत जैन हा फक्त भारतातला नाही तर जगातला सर्वांत श्रीमंत भिकारी आहे, असं म्हणतात. तो मुंबईत राहतो. त्याची मुंबईत साडेसात कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. भरत बऱ्याच वर्षांपासून भीक मागत आहे, करोडो रुपयांची प्रॉपर्टी असली तरी तो आजही भीकच मागतो. भरत तरुण असल्यापासून भीक मागतोय. मुंबईतलं छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानात भीक मागून तो आपलं घर चालवतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरत जैन मुंबईत करोडो रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहतो. तसंच त्याचं पुण्यातही त्याचं करोडो रुपयांचं घर आहे आणि ठाण्यात त्याची दोन दुकानं आहेत.
भरत जैनजवळ करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्याची एकूण संपत्ती 7.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यात त्याच्या बिझनेसमधून होणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश आहे. भरतकडे दोन बेडरूमचा फ्लॅट आहे, या फ्लॅटची किंमत 1.20 कोटी रुपये आहे. त्याची ठाण्यात दोन दुकानं असून, त्यांचं महिन्याला 50 हजार रुपये भाडं मिळतं. भरत भीक मागून दिवसाला 2500 रुपयांपर्यंत कमावतो. भीक मागून इतकी प्रॉपर्टी जमवली असली तरी तो आजही भीक मागतो. भरतची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात. त्याच्याजवळ असलेल्या दुकानाचं भाडं येतं, तरीही तो रोज भीक मागायला जातो. त्याचे कुटुंबीय म्हणतात, की ते भरतला भीक मागणं सोडायला सांगत आहेत; पण भीक मागून चांगली कमाई होत असल्याने त्याला हे काम सोडायचं नाही. भरत वर्षभरात जवळपास नऊ लाख रुपये कमवतो असं म्हणतात. तो भीक मागून जेवढी कमाई करतो तेवढा तर नोकरी करणाऱ्या खूप जणांना पगारही मिळत नाही.