जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
भुसावळ शहरात ३१ वर्षीय जिम ट्रेनर नाजिश नासिर शेख याच्यावर उसने पैसे परत मांगितल्याच्या कारणामुळे महिलेसह इतर दोघांनी तलवार व चाकूचे वार करून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजिश शेख याने सुलतानाबी मुबारक खान हिस उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितल्याचा राग आल्याने रविवारी सकाळी सुलतानाबी मुबारक खान (३५, रा. स्वामी विवेकानंद शाळेजवळ केशवनगर, भुसावळ), इजहार उर्फ ईज्जू जलालुद्दीन शेख (२३, रा. आझादनगर, भुसावळ), आसिफ शेख (२१, रा. आझादनगर भुसावळ) यांनी तलवारीने व चाकूने वार करून नासीर यास ठार मारले.
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात नाजीर हा पत्नी, मुलगा, मुलीसह वास्तव्यास होता. माहीर फिटनेस सेंटर चालवून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तत्काळ जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मयताची आई शर्मिला शेख नासिर यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी महिला वगळता इतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिनाभरापूर्वीच भुसावळ काही लागोपाठच्या खूनांच्या घटनांनी हादरले होते.