
जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा रोड मॅप ठरविण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आज (दि.३०) बैठक बोलावली आहे. यावेळी ते सहा विभागांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन, बंदर व नागरी विमान चालन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग विभागाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, तत्पूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हे संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड म्हणून त्यांच्यावर विविध स्तरातून आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वपक्षीयांनी भव्य मोर्चा काढून मंत्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर हल्लाबोल केला होता. मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात अद्याप कराड याचे नाव आलेले नाही, परंतु पवन ऊर्जा निर्मितीच्या आवादा ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून कराड फरार असून हा तपास आता सीआयडीमार्फत सुरू आहे. त्या अनुषंगाने आज (रविवारी) दुपारी त्यांची पत्नी मंजीली कराड यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.