जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
भरधाव जाणाऱ्या दुचाकीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार श्रीराम सोनाऱ्या बारेला (वय ३१, रा. अमोदा खुर्द, ता. जळगाव) याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला शालीक बळीराम सपकाळे (रा. आमोदा खुर्द) हा गंभीर जखमी झाला. ही घटना दि. १ सप्टेंबर रोजी किनोद ते आमोदा फाटारोडवरील घार्डी फाट्याजवळी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी प्रवीण मल्हारी सपकाळे रा. करंज ता. जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील गंधावल येथील राहणारा श्रीराम सोनाऱ्या बारेला हा मजूरीसाठी आमोदा गावात स्थायीक झाला होता. शेतमजूरी करुन आपल्या कुटुंबाचा उदिनर्वाह करीत होता. दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास तो (एमएच १४, डीएल ७३१४) क्रमांकाच्या दुचाकीने शालीक सपकाळे याच्यासोबत जात होता. किनोद ते आमोदा फाटा रोडवरील घार्डी फाट्याजवळ असलेल्या मनूदेवी मंदिराजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०४, डीए ७५६०) क्रमांकावरील प्रवीण मल्हारी सपकाळे रा. करंज, ता. जळगाव या दुचाकीस्वाराने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.
समोरासमोर झालेल्या दुचाकींच्या धडकेत श्रीराम बारेला याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला शालीक सपकाळे हा गंभीर जखमी झाला. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा भाऊ जगन सोनाऱ्या बारेला याने तालुका पोलिसात ताक्रार दिली. त्यानुसार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालविणाऱ्या प्रवीण मल्हारी सपकाळे रा. करंज ता. जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.