जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
जामनेर तालुक्यातील नेरी येथील एकाकडून भारत गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून दोघांनी २ लाख ३४ हजार ९०० रुपये लुबाडल्याची तक्रार बुधवारी पोलिसात दाखल झाली आहे. तक्रारदाराने १३ ते १८ डिसेंबर दरम्यान ही रक्कम ऑनलाइन प्रणालीद्वारे दोघांना पाठविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष पंढरीनाथ वाघोडे (नेरी बदक. ता. जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना मनोजकुमार सोनी असे नाव सांगणाऱ्या इसमाने सांगितले की, जामनेर येथील भारत गॅसची डिलरशिप रिक्त असून, ती तुम्हाला मिळू शकते.
ही डिलरशिप फक्त उज्ज्वला गॅससाठी असून, तुम्हाला मासिक २० हजार गोडाऊन व ऑफिस भाडे दिले जाईल. सोनी यांनी मागणी केलेली कागदपत्रे त्यांनी व्हाट्स अॅपवर पाठविली. पढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचे सांगितले. फिर्यादीने १३, १६ व १८ रोजी बैंक खात्यातून संशयित आरोपींना २ लाख ३४ हजार ९०० पाठविले. पोलिसांनी संशयित मनोजकुमार सोनी व आशिष शुक्ल यांच्याविरुद्ध बीएमएस कलाम ६६ (ड), ३१८ (२). ३१९ (२), ३३६ (२), ३३८ व ३४० (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार तपास करीत आहेत.