जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच भडगाव तालुक्यातील कजगाव येथे मलकापूर ते विठ्ठलवाडी या धावत्या एस. टी. बसचे मागील एक चाक निखळले तर दुसऱ्या चाकाचे टायर फुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाताजाता वाचली. कजगावजवळील या घटनेनंतर ८० प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर देवा बरोबरच बस चालकाचे आभार मानत समोरच असलेल्या मंदिरात सर्व प्रवाशी नतमस्तक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर ते विठ्ठलवाडी जाणारी एस. टी. बस (एमएच- २०, बीएल- ३२९६) ही पावणेबारा वाजेदरम्यान कजगाव ते भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ आल्यानंतर धावत्या बसचे मागील एक चाक निखळून पडले. तर लगेचच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले, यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस एका बाजूला धावू लागली. परंतु, चालकाने समय सूचकता दाखवत बस थांबवली. बस एका बाजूला झुकताच प्रवाशांचा आक्रोश व रडारड सुरु झाली होती. परंतु, बस थांबताच प्रवाशी काही मिनिटातच खाली उतरले अन् देवाचे नाव घेत आभार मानू लागले. सोबतच चालकाचे ही त्यांनी आभार मानले. दरम्यान, ही घटना जेथे घडली त्या ठिकाणी बसच्या एका बाजुस दत्त मंदिर व दुसऱ्या बाजुस साईबाबा मंदिर आहे. प्रवाशांचे या मंदिराकडे लक्ष जाताच देवाची कृपा झाली वाचलो रे बाबा, असे म्हणत महिला प्रवाशी मंदिरात नतमस्तक झाल्या. काही काळासाठी स्तब्ध झालेले प्रवाशी या धक्क्यातून बाहेर पडले. काही वेळानंतर वाहक व चालक यांनी भडगावकडून येणाऱ्या बसमध्ये पुढील प्रवासासाठी या प्रवाशांना मार्गस्थ केले.