जळगाव मिरर । ३० जुलै २०२६
हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेला विष्णू उन्नीकृष्ण ओल्लेकात (वय २९) हा महिनाभरापुर्वी पुण्याहून जळगावला आला होता. त्याने दि. २८ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना सकाळी ऑटो नगरात घडली. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच विष्णूच्या वडीलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ऑटोनगर परिसरात विष्णू उन्नीकृष्ण ओल्लेकात (वय २९) हा तरुण वास्तव्यास असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पुर्ण केले आहे. तो काही महिन्यांपासून पुणे येथे नोकरीनिमित्त कामाला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून तो जळगाव येथील आपल्या घरी परतला होता. दि. २७जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यानंतर विष्णू वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशी दि. २८ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खाली आला नाही. त्यामुळे त्याचे वडील उन्नीकृष्ण ओल्लेकात त्याला उठवण्यासाठी वरच्या खोलीत गेले. याठिकाणी त्यांना विष्णू गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला.
वडिलांना मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने विष्णूला खाली उतरवले आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विष्णू उपचारापूर्वीच मृत पावल्याचे घोषित केले. विष्णूने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकास्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण मुलाच्या अचानक झालेल्या अशा अकल्पित मृत्यूचा वृद्ध वडिलांनामानसिक धक्का बसला.
मुलाने आत्महत्या केल्यामुळे त्याचे वडील उन्नीकृष्ण ओल्लेकात यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेमुळे ओल्लेकात कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे संपूर्ण ऑटोनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















