
जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४
देशातील जनता गेल्या काही वर्षापासून महागाईने त्रस्त असतांना आता जनतेला तूर्त दिलासा मिळण्याची बातमी समोर आली आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुका येवून ठेपल्या आहे. या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे त्याचे कारण आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकृत सूत्रांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये कपात केली जाऊ शकते.
एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमती 12% कमी झाल्या आहेत, परंतु तेल विपणन कंपन्यांनी या काळात किंमती कमी केल्या नाहीत. तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल 2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये शेवटची कपात केली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपयांच्या वर, तर डिझेल 90 रुपयांच्या वर आहे.
या कंपन्या सध्या प्रतिलिटर 10 रुपये कमावत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) च्या नफ्यात सुमारे 5 पटींनी वाढ झाली आहे. IOCL, BPCL आणि HPCL ने 2022-23 या आर्थिक वर्षात 33,000 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. या आर्थिक वर्षात (2023-24) हा नफा 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. म्हणजे त्यात 3 पट वाढ दिसून येते. Q2 FY24 पर्यंत, तीन कंपन्यांची एकत्रित उलाढाल 57,091.87 कोटी रुपये होती, जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,137.89 कोटी रुपये होती, म्हणजेच आतापर्यंत 4,917% (5 पट) वाढ झाली आहे.