जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४
राज्यातील विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा कालच सुरु झाली. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली आहे. जुन्नरच्या लेण्याद्रीहून या यात्रेचा शुभारंभ आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडेल.यावेळी खा.अमोल कोल्हे यांचे दमदार भाषण देखील झाले यावेळी त्यांनी अजित दादांवर तुफान टीका केली आहे.
खा.कोल्हे म्हणाले कि, जनतेला डोलवण्यासाठी गुलाबी रंगाची पुंगी काढण्यात आली आहे. सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघाली आहे असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले आहे. अजित पवार यांच्याकडून सध्या गुलाबी थीमचा वापर केला जात आहे. त्यांच्या जनसन्मान यात्रेतही गुलाबी फिव्हर पाहायला मिळाला होता. यावरून अमोल कोल्हे यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघाली आहे. एखाद्या अॅड एजन्सीने एखादे जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेले आहे”, असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला आहे.
तसेच यावेळी अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली आहे. अमोल कोल्हे म्हणाले, लाडकी खुर्ची योजना सुरू आहे. या लाडक्या खुर्चीसाठी वाट्टेल तितके लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरू आहेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचे आहे. त्यासाठी ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ आपण काढतो आहे” असे अमोल कोल्हे म्हणाले.