
जळगाव मिरर | २८ मे २०२६
ऐन विवाहाच्या मुहूर्तावरच अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडत असल्याची माहिती कळाली आणि ‘चाइल्ड हेल्पलाइन’ची यंत्रणा कामाला लागली. यंत्रणेने रावेर आणि चोपड्याच्या प्रशासनाला ‘अलर्ट’ केल्यानंतर दोन बालविवाहांना रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. संबंधित पालकांना शुक्रवारी बाल हक्क समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी रावेर आणि चोपडा तालुक्यातील गावात दोघा अल्पवयीनींचा विवाह होत असल्याची माहिती ‘चाइल्ड हेल्पलाइन’वर मिळाली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषीकेश चौधरी यांनी रावेर पोलिसांना घटनेची माहिती कळविली. विवाह दुपारी पार पडणार असताना पोलिस कर्मचारी संजय चौधरी तसेच ग्रामसेवक विजय पाटील यांनी विवाहस्थळ गाठले आणि वधूच्या तयाची पडताळणी केली. वधू अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच हा विवाह रोखण्यात आला. तशीच माहिती चोपडा तालुक्यातील बालविवाहाविषयी मिळाली. काळे यांनी चोपड्याचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्याशी संपर्क साधला. देसले यांनी पथक पाठवून बालविवाह ऐनवेळी रोखला. तसेच पालकांना कायद्यानुसार समजही दिली. या कारवाईत समन्वयक नीलेश चौधरी, कुणाल शुक्ल यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, चोपडा व रावेर तालुक्यातील नियोजित बालविवाहप्रकरणी वधू-वराच्या पालकांना बाल हक्क समितीसमोर शुक्रवारी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शुक्रवारी पालकांची भूमिका पाहून कारवाईची दिशा ठरणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.





















