जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात पती व पत्नीमध्ये नियमित भांडण होत असते पण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील असेच एक रात्री सुरु झालेले भांडणामुळे डॉक्टर पत्नीने चक्क घर पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको एन-२ या उच्चभ्रू परिसरातील नालंदा अपार्टमेंटमधील डॉक्टर दांपत्याचा गेल्या काही दिवसांपासून अविश्वास आणि वैवाहिक जीवनातील वाद विकोपाला गेला. रविवारी मध्यरात्री दोघांत कडाक्याचे भांडण झाले. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत पत्नीला नातेवाइकांकडे पाठवले. मात्र, सोमवारी २९ जानेवारी सकाळी सहा वाजता परत येत संतापलेल्या पत्नीने पतीवरील रागातून चक्क घरच पेटवून दिले. यात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, आपल्या घरासह अपार्टमेंटमधील इतर ११ घरांनाही धोका निर्माण हाेईल, याचा यत्किंचितही विचार या डॉक्टर महिलेने केले नाही. सजग नागरिकांमुळे अनर्थ टळला. अपार्टमेंटमधील सर्वांना तत्काळ बाहेर काढले आणि अग्निशामक विभागाला पाचारण केले. डॉ. विनीता गोविंद वैजवाडे असे फ्लॅटला आग लावणाऱ्या आरोपी, विवाहितेचे नाव असून ती एका आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापिका आहे.
रात्री भांडण झाल्यानंतर विनीता सकाळी ६ वाजता पुन्हा अपार्टमेंटमध्ये आली. फ्लॅटचा दरवाजा वाजवत डॉ. गोविंद यांना दरवाजा उघडण्यास सांगत होती. तेव्हा डॉ. गोविंद यांनी मर्दा यांना बोलावले. माझ्या जिवाला हिच्यापासून धोका असल्याने मी दरवाजा उघडणार नाही, असे गोविंद म्हणत होते. पावणेसातपर्यंत हा वाद सुरू होता. त्यानंतर अखेर दरवाजा उघडून गोविंद हे इमारतीच्या खाली आले. विनीताने स्वत:चे सामान बॅगेत भरले आिण ज्वलनशील पदार्थाने बेडरूममधील कॉट, गादी पेटवली. त्यानंतर संपूर्ण घराने पेट घेतला.
घटनेनंतर मनोज मर्दा या सजग रहिवाशाने अपार्टमेंटमधील सर्वांना तत्काळ बाहेर काढले, विद्युत पुरवठा बंद केला. त्यांच्या मुलाने डॉ. वैजवाडेंच्या घरातील २ गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने सारे बचावले. कॉलनंतर ५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. आग जास्त असल्याने पदमपुरा, सिडकोतील बंब मागवले. सुमारे दोन तासांच्या परिश्रमानंतर आग विझविली, अशी माहिती अग्निशमनचे विनायक कदम यांनी दिली.