जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४
राज्यात राजकीय धुमाकुळ सुरु झाली असून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता नुकतेच शरद पवारांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त पवारांनी कार्यकत्यांची भेट घेत शुभेच्छा स्विकारल्या. या वेळी त्यांनी अजित पवार आणि सरकारवर देखील टीका केली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष उमेदवारांना रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काहीच केले नाही. त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार? अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला आहे. शरद पवार हे जातीवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी मात्र, राजकारणामुळे 50 वर्षानंतर प्रथमच पवार कुटुंबीयांचे पाडव्याच्या दिवशी दोन स्वतंत्र सोहळे झाले आहेत. यात शरद पवारांचा सोहळा बारामतीत गोविंदबागेत झाला तर पुतण्या अजित पवारांचा सोहळा काटेवाडी या पवार कुटुंबियांच्या मूळ गावी झाला. गेल्या वर्षी अजित पवार, शरद पवारांमध्ये फूट पडली असली तरी दिवाळी पाडवा सोहळा एकत्रित झाला होता.
यावर्षी बारामती मध्ये दोन पाडवा कार्यक्रम पार पडले. शरद पवार यांचा एक तर अजित पवार यांचा एक कार्यक्रम झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांना दोन्ही ठिकाणी जावे लागले. कार्यकर्त्यांना झालेल्या या त्रासाची आपल्याला खंत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र गोविंदबागेत आयोजित पाडव्यासाठी पवार कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. केवळ अजित पवार यांना काही महत्त्वाची कामे असल्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे पवार म्हणाले.