जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२४
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावातील रामनगर परिसरात बिहारमधून मोलमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबातील दहावर्षीय चिमुरडीवर शेतात बलात्कार करून अमानुषपणे गळा घोटून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या क्रूर घटनेमुळे शियेसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकण्यात आल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने पीडितेचा गळा घोटून जीव घेतल्याने संतप्त पडसाद उमटत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिये येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा अमानुष खून झाल्याची माहिती गुरुवारी सकाळी शहर व जिल्ह्यात वार्यासारखी पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसांकडून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. चिमुरडीच्या घराच्या पिछाडीस 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतातील ऊस पिकाच्या दिशेने बुधवारी दुपारी 2.10 वाजता संशयित हा पीडित मुलीला घेऊन जात असताना दोन फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहेत. बिहारमधील कैमुरे जिल्ह्यातील सवार येथील कुटुंबीय तीन वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी शियेतील दत्तनगर येथील खुटाळे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्याला आले. या दाम्पत्याला 3 मुली आणि दोन मुले अशी 5 अपत्ये आहेत.
पीडित मुलीचे आई-वडील गोकुळ शिरगाव येथील फौंड्रीमध्ये कामाला आहेत. पीडित मुलगी कुटुंबीयांची ज्येष्ठ कन्या… आई-वडील कामावर गेल्यानंतर ती छोट्या चार भावंडांचा सांभाळ करीत असे. बुधवारी जेवण आटोपल्यावर दुपारी 1 वाजता ती भावंडांसह अंगणात खेळत बसली होती. यावेळी तिचा 25 वर्षीय मामा घरातच होता. दुपारी जेवण केल्यानंतर आपण झोपी गेल्याचे तो सांगतो. नेमके याच काळात पीडिता घरातून बेपत्ता झाली. सायंकाळी सहा वाजता मुलीची आई कामावरून घरी आली. यावेळी मुलगी घरात दिसत नसल्याने तिने चौकशी सुरू केली. घरासह परिसरात शोध घेतला. पण तिचा सुगावा लागला नाही. घराजवळ राहणार्या मुलीच्या मैत्रिणीकडेही चौकशी केली.