जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२३
राज्य सरकार आणि प्रशासन यांनी पत्रकारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न तातडीने सोडवावेत, या मागणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. राज्यात सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील साडेतीन हजार पत्रकार सरकार आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती महासंचालक जयश्री भोज यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. वेगवेगळ्या दहा मागण्या प्रामुख्याने या आंदोलनात होत्या. मंत्रालयात राज्याच्या माहिती महासंचालक जयश्री भोज यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भेट घेतली. मागणी आणि आंदोलनाच्या निमित्ताने असणाऱ्या समस्या माझ्यापुढे आल्या आहेत, त्या समस्या मी तातडीने सोडवतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबईचे अध्यक्ष सुरेश ठमके, केंद्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्य सेलचे प्रमुख भिमेश मुतुला केंद्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. राज्याचे माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनाही या मागणीचे निवेदन देण्यात आले. कांबळे यांनीही अनेक विषय सखोलपणे करता येतील आणि ते करू, असे सांगितले. अधिस्वीकृती कार्ड, पत्रकार सन्मान योजना, पत्रकारांसाठी महामंडळ, अनेक प्रलंबित असणारे जीआर, वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिराती संदर्भातल्या अडचणी, असे अनेक विषय या मागणीमध्ये होते. राज्यभरामध्येही आंदोलनासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये साडेतीन हजार पत्रकारांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदने दिली. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आज आम्ही प्रशासनाच्या समोर धरणे आंदोलन करताना निषेध नोंदवला, सरकारने आणि प्रशासनाने पत्रकारांच्या असणाऱ्या गंभीर विषयांकडे लक्ष द्यावे. आज केलेल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पत्रकारांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार यांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला. ‘व्हाईस ऑफ मीडिया ’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष संजय मालानी, राजेंद्र थोरात, अजितदादा कुंकूलोळ, मुंबई विभागीय अध्यक्ष सुरेश ठमके, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश उजेनवाल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते, कोकण अध्यक्ष प्रवीण कोळआपटे यांनी राज्यातील सर्व पत्रकारांचे आभार मानले.