जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६
धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रवासी रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात एक अनोळखी प्रवासी ठार असून अपघातानंतर रिक्षाचालक फरार झाला आहे.

या अपघातातील मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, वराड फाट्याजवळ रिक्षा (एमएच १९, एक्यू- ७३७०) उलटली. या दुर्दैवी अपघातात रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर रिक्षाचालकाने दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने उलटलेली रिक्षा उचलून पुन्हा उभी केली. त्यानंतर रिक्षा वराड बुद्रुक गावात आणून लावून रिक्षाचालक घटनास्थळावरून फसार झाला आहे. तर, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी व्यक्तीला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्या अनोळखी व्यक्तीला मयत घोषीत केले. मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर, रिक्षाचालक अपघातानंतर फरार झाल्याने या घटनेबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.




















