
जळगाव मिरर | ६ मे २०२६

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान पोलिस व प्रशासनाकडून शेतकरी आणि महिलांना घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे ६६ किलोमीटरचा रिंग रोड विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी दरी, मातोरी, मुंगसरे, मखमलाबादसह अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. मात्र या भूसंपादनाविरोधात अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
असे असतानाही शुक्रवारी रात्री उशिरा ग्रामस्थांना व्हॉट्सॲपवर मोजणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी जी. व्ही. एस. पवनदत्ता, तहसीलदार आणि मोठा पोलिस बंदोबस्त सकाळी सात वाजताच मुंगसरे गावात दाखल झाला.
यावेळी मोजणीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना आणि महिलांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. काही महिलांनी रडत आपली व्यथा मांडली असून प्रशासनाने दबाव टाकत कारवाई केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना प्रशासनाने एवढ्या घाईत आणि पहाटेच्या सुमारास मोजणी का केली?” असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर रिंग रोड प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सत्तेच्या माजात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही मस्ती सरकारला महागात पडेल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. नाशिक रिंग रोडच्या मोजणीवेळी काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशासनाच्या कारवाईविरोधात ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त होत असून येत्या काही दिवसांत हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.




















